* माहिती देणार्याचे नाव गोपनीय ठेवणार, बक्षीस देणार
बीड, २ जानेवारी (हिं.स.) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 23 दिवस पूर्ण झाले आहेत. या हत्या प्रकरणातील काही आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असले तरी आणखी तीन आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले (26), कृष्णा शामराव आंधळे (30), सुधीर ज्ञानोबा सांगळे (23) हे अद्यापही फरार आहेत. या तिघांची माहिती देणार्यांना बक्षीस जाहीर करण्यात आली आहे.
उपरोक्त तीन आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होतं आहे. अशातच पोलिसांकडून फरार आरोपींच्या तपशीलाबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. या प्रसिद्धीपत्रकात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे यांना फरार घोषीत करण्यात आलं आहे. या आरोपींची माहिती देणाऱ्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल, तसेच बक्षीसही देण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वरील आरोपींचे ठाव ठिकाण कोणास माहिती असेल किंवा फोटोमधील आरोपी दिसून आल्यास त्यांनी संपर्क साधून आरोपीची माहिती कळवावी, माहिती देणार्याचे नाव अत्यंत गोपनीय ठेवण्यात येईल आणि योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असं पोलिसांनी या पत्रकात म्हटलं आहे.
पोलिसांची सात पथकं राज्यासह देशभरात सुदर्शन घुलेच्या मागावर आहेत. सीआयडीलाही हे आरोपी अद्याप सापडू शकलेले नाहीत.
वरील फोटोमध्ये असलेले व्यक्ती आरोपी असून त्यांच्यावर खुनासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. हत्या झाल्यापासून हे तिन्ही आरोपी फरार आहेत. त्यांना पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलीस दलाकडून चालू आहेत. या आरोपींविषयी ठाव ठिकाणा कोणास माहिती असेल किंवा फोटोमधील आरोपी दिसून आल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी