तिरोडा शहरामधील नामवंत शाळेतील प्रकार
गोंदिया, 21 जानेवारी (हिं.स.) : शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीवरच शिक्षकाने वाईट नजर ठेवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहरातील नामवंत हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला असून, त्या शिक्षकावर सोमवारी रात्री 1 वाजता तिरोडा पोलिसांनी बाललैंगिक अधिनियमान्वये अत्याचार गुन्हा दाखल केला आहे. सुनील आत्माराम शेंडे (५२, रा. गांधी वॉर्ड, तिरोडा) असे आरोपीचे नाव आहे. सुनील शेंडे हा तिरोडा शहरातील एका नामवंत शाळेत एनसीसी शिक्षक पदावर कार्यरत असून, दहाव्या वर्गातील १५ वर्षीय पीडित मुलीशी अश्लील चाळे करायचा. मुलगी शाळेत गेल्यावर आरोपी शेंडे तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलवायचा. संधी मिळेल त्या ठिकाणी तो तिला पकडून तिच्याशी अश्लील चाळे करायचा. अश्लील चाळे केल्यानंतर या प्रकाराची वाच्यता कुणाकडे करू नकोस, घरच्यांना काही सांगू नकोस अन्यथा याद राख. याचा भुर्दंड तुला सहन करावा लागेल अशी धमकी देत असल्याचे मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार अधिनयमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar