सोलापूर, 21 जानेवारी (हिं.स.): शेत जमिनीचा प्रलंबित निकाल देण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंढरपूर येथील उपविभागीय कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिकासह शिपायाला रंगेहात पकडले. ही कारवाई उपविभागीय कार्यालयात करण्यात आली. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या याप्रकरणी महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते आणि शिपाई नितिन शिवाजी मेटकरी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यातील तक्रारादाराने शेत जमिनी संदर्भात येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. यावर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी महसूल सहाय्यक किशोर मोहिते याने ६० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती ५५ हजार स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यानुसार प्रांताधिकारी कार्यालयामध्ये रोख ५५ हजार रुपये स्वीकारताना शिपाई नितीन शिवाजी मेटकरी याला रंगेहात पकडण्यात आले.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड