नेपाळ आणि भारतात देखील बसले भूकंपाचे हादरे
नवी दिल्ली, 07 जानेवारी (हिं.स.) : तिबेटमध्ये आज, मंगळवारी सकाळी 9.05 वाजता भूकंपाचे जोरदार हादरे बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी मोजली गेली. यात आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. यासोबतच नेपाळ आणि भारतातही या भूकंपाचे हादरे बसले आहेत.
यासंदर्भात चीनच्या अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने (सीईएनसी) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 9:05 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 इतकी मोजली गेली. तिबेटच्या शिजांग शहरातील डिंगरी काउंटीमध्ये 7.1 तीव्रतेच्या भूकंपात 54 जणांचा मृत्यू झाला असून 62 हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू 28.5 अंश उत्तर अक्षांश आणि 87.45 अंश पूर्व रेखांशावर 10 किलोमीटर खोलीवर होता. तत्पूर्वी, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, मंगळवारी सकाळी 6 वाजेपासून तिबेटच्या शिजांगमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. येथे सकाळी 6.30 वाजता 10 किमी खोलीवर 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर 7 वाजून 2 मिनीटांनी 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप आला. तर 7.07 वाजता 4.9 रिश्टर स्केल आणि 7 वाजून 13 मिनीटांनी 5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यामुळे लोकांनी घाबरून आपली घरे सोडून मोकळ्या जागेकडे धाव घेतली. यासोबतच नेपळमध्येही सकाळी 6 वाजेपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. भारतातील अनेक राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. याचा सर्वाधिक फटका बिहारला देखील बसला. यासोबतच आसाम, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी घाबरलेले लोक घराबाहेर पडले. यूएसजीएस भूकंपशास्त्रानुसार, भूकंपाचे केंद्र लोबुचेच्या 93 किमी ईशान्येकडे होते.
पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. ज्या भागात या प्लेट्स आदळतात त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. खालील उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि गडबड झाल्यानंतर भूकंप होतो.
----------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी