ओटावा, 7 जानेवारी (हिं.स.)।कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ट्रुडो यांनी सोमवारी ओटावा येथील रिडेऊ कॉटेज येथील आपल्या निवासस्थानाबाहेर पत्रकार परिषद घेत लिबरल पक्षाचे नेते तसेच पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे.ट्रुडो यांच्याविरोधात पक्षात असंतोष वाढत असताना ट्रुडो यांनी हे पाऊल उचलले आहे.मात्र, जोपर्यंत पक्षाचा नवा नेता निवडला जात नाही तोपर्यंत ते या पदावर कायम राहतील.
कॅनडामध्ये या वर्षी संसदीय निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या पक्षात नेतृत्व बदलाची मागणी होत होती. ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर नियोजित वेळेपूर्वी निवडणुका घेण्याची मागणी होऊ शकते, असे मानले जात आहे. ट्रूडो यांच्यावर त्यांच्या लिबरल पक्षाच्या खासदारांकडून अनेक महिन्यांपासून पायउतार होण्याचा दबाव होता. नुकतेच उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी ट्रुडो सरकारवर गंभीर आरोप करत पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर ट्रुडो यांच्यावर दबाव आणखी वाढला होता.त्यामुळे त्यांना पद सोडावे लागले. राष्ट्रीय मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ट्रूडोवर भारतविरोधी अजेंडा चालवल्याचाही आरोप आहे. गेल्या दीड वर्षांपासून भारतविरोधी अजेंडा राबवून ट्रुडो यांना आपल्या सरकारविरोधातील सत्ताविरोधी लाट शांत करायची होती, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही.जस्टिन ट्रूडो 2013 मध्ये लिबरल पक्षाचे प्रमुख बनले होते. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी पहिल्यांदा कॅनडाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ट्रुडो यांना चौथ्यांदा पंतप्रधानपदावर दावा करायचा होता. मात्र त्यांना ते शक्य होऊ शकले नाही.
जस्टिन ट्रूडो यांनी देशाला उद्देश केलेल्या भाषणात म्हटले की, येत्या निवडणुकीत देशाला पात्र नेता मिळेल. मला पक्षांतर्गत लढाई लढावी लागणार असेल, तर त्या निवडणुकीत मी सर्वोत्तम निवड होऊ शकत नाही. नवीन पंतप्रधान आणि लिबरल पक्षाचे इतर नेते पक्षाची मूल्ये पुढे नेतील.जस्टिन ट्रुडो मागील ११ वर्षांपासून लिबरल पक्षाचे नेते असून ९ वर्षांपासून पंतप्रधान आहेत. पण, गेल्या काही काळापासून त्यांना जगभरातून टीकेचा सामना करावा लागला आहे. खलिस्तानी समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर ट्रूडो सरकारने यात भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला होता, त्यांनतर ट्रूडो सरकारचे भारत सरकारसोबतचे संबंधही बिघडले होते.या आरोपाला हे भारताने चोख प्रत्युत्तर मानले जात आहे.आता कॅनडाचा नवा पंतप्रधान कोण होणार, हे भारतासाठीही महत्वपूर्ण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash