- सोनिया दुहान आमच्या पक्षात नाहीत
मुंबई, 8 जानेवारी (हिं.स.) - राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या लोकसभेतील आठपैकी सात खासदारांशी संपर्क साधून अजित पवारांसोबत येण्याची ऑफर सुनील तटकरेंनी दिल्याचे वृत्त माध्यमातून समोर येत आहे. दरम्यान आमच्याकडून तसा कोणताही प्रयत्न केला गेला नाही, कुणालाही फोन गेला नाही, असं स्पष्टीकरण अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिलं. तसेच सोनिया दुहान या राष्ट्रवादीच्या नेत्या नाहीत, त्यामुळे त्यांनी काय केलं यावर बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. शरद पवार गटाच्या लोकसभेतील सात खासदारांशी तटकरेंनी संपर्क साधल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच सोनिया दुहान यांनीही या खासदारांशी संपर्क साधून विकासकामांसाठी एनडीएसोबत येण्याचं आवाहन केल्याचा दावा खासदार अमर काळे यांनी केला. याबाबत तटकरे यांनी नकार दिला आहे.
राष्ट्रवादी-भाजप संबंधांबाबत योग्य वेळी सांगेन
तटकरे म्हणाले की, विधानसभेतील पराभवानंतर त्यांची जागा काय आहे ते दिसून आलं. मी गेली 40 वर्षे राजकारणात आहे. त्यामध्ये कधीही बाप-लेक असा शब्दप्रयोग नाही. मी कुणाशीही संपर्क केला नाही. दिल्लीत अनेक कार्यक्रमात खासदार भेटतात. त्यावेळी काही चर्चा होते. पण अशा प्रकारचा संपर्क केलेला नाही. आमच्याकडून कुणालाही फोन गेला नाही. केवळ चर्चेत राहण्यासाठी केला गेलेला हा प्रयत्न आहे. सोनिया दुहान या काही आमच्या पक्षात नाहीत. त्यांना आमच्याकडून कोणतेही अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देणार नाही. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये काय चर्चा झाली याबद्दल मला काही माहिती नाही. पण कुणी, कुठे, काय बोललंय याची माहिती मी योग्य वेळी देईन. 2014 पासून 2024 पर्यंत राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्यासाठी काय प्रयत्न केले गेले हे योग्य वेळी सांगेन, असंही तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केले जात असल्याची माहिती आहे. याची जबाबदारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर सोपवण्यात आली होती अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सात खासदारांची भेट घेत त्यांना सोबत येण्याची ऑफरही देण्यात आली. सुप्रिया सुळे वगळता उर्वरित खासदारांना सोबत येण्याची ऑफर देण्याची आल्याची माहिती आहे. मात्र संपर्क झालेल्या सातही खासदारांनी तटकरेंची ही ऑफर धुडकावली असा दावा केला जातोय.
खासदार अमर काळे यांनी तटकरे संपर्क करत नसून सोनिया दुहान या संपर्क करत होत्या अशी माहिती दिली. विकासकामं करून घ्यायची असतील तर एनडीएसह जावं लागेल असं सोनिया दुहान यांनी म्हटल्याचा गौप्यस्फोट अमर काळेंनी केलाय. हा सगळा प्रकार समजल्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रफुल पटेलांना फोन करत तटकरेंबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
खासदार अमर काळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, काँग्रेसच्या सोनिया दुहान आमच्यासोबत संपर्क साधत होत्या आणि त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत यावे असा आग्रह केला होता. जर विकास कामे करायची असतील तर तुम्हाला एनडीएमध्ये आल्याशिवाय पर्याय नाही असंही त्या म्हणाल्या होत्या. केवळ अमर काळेच नाही तर निलेश लंके, भगरे गुरुजी, धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग बप्पा या सर्वांशी त्यांनी संपर्क साधला होता. सुनील तटकरे यांनी कधीही आमच्याशी संपर्क साधला नाही. सोनिया दुहान संपर्क करत होत्या. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे याबाबत आम्ही तक्रार केली आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
पक्ष आणि शरद पवार जी भूमिका घ्यायला लावतील, ती भूमिका आम्ही या पुढच्या काळात घेऊ, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार रोहित पाटील यांनी दिली आहे.
अजित पवार गटाकडून संपर्क केल्याच्या चर्चांवर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हटले की, मला कोणाचाही फोन आलेला नाही.
शरद पवारांच्या पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले की, सुनील तटकरे यांच्याशी असा कुठलाही संपर्क झालेला नाही. सभागृहात गेल्यानंतर एकमेकांना भेटतो, बोलतो मात्र राजकीय चर्चा झालेली नाही. कुठलीही ऑफर आलेली नाही आणि असा कुठला निर्णय होणार नाही. राजकारणात कोणत्याही गोष्टीला सामोरं जायचं असतं. घाबरुन निर्णय बदलायचा नसतो. सत्ता आल्यास सत्ता भोगायची आणि सत्ता नसल्यास लढायची तयारी ठेवायची. कुणाचीही राजकीय भेट झाली नाही, राजकीय चर्चा झालेली नाही. अधिवेशन काळात हाय बाय नमस्कार झाला. सुनील तटकरेंना भेटलो नसून खासदार देखील भेटले नाहीत, असंही लंके म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी