मुंबई , 9 जानेवारी (हिं.स.)। बॉर्डर - गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. या मालिकेत टीम इंडियाच्या फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही मात्र गोलंदाजांनी आपली भूमिका उत्तम निभावली. पण या मालिकेनंतर आता टीम इंडियावर दुखापतीचं ग्रहण लागलं आहे.मालिकेदरम्यान बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्यानंतर आता आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.
बॉर्डर गावस्कर मालिकेच्या शेवटच्या सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. त्याच्यानंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे मन जिंकणाऱ्या आकाश दीपला दुखापत झाली आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात आकाश दीपला पाठदुखीमुळे खेळता आले नव्हते.त्यांनतर आकाश दीपला उपचारांसाठी बंगळुरू येथील एनसीए (नॅशनल क्रिकेट अकादमी) येथे जावे लागेल. एनसीएमधील बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर बारकाईने लक्ष ठेवेल आणि आवश्यक उपचार देईल. सध्या तरी त्याला महिनाभर मैदानापासून दूर रहावे लागणार आहे.आकाश दीपची दुखापत बंगालसाठी देखील एक धक्का मानला जात आहे. आकाश दीपला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यांमध्ये त्याने 5 विकेट्स घेतल्या होत्या. एकूण ७ कसोटी सामने खेळणारा आकाश दीप अद्याप भारतासाठी एकदिवसीय किंवा टी-20 सामने खेळलेला नाही. पण कसोटी सामन्यातील त्याची लय पाहिल्यानंतर, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता होती मात्र आता दुखापतीमुळे त्याला संधी मिळणे अवघड झाले आहे.
भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 12 जानेवारी रोजी आपला संघ जाहीर करायचा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद शमी हे दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे टीम इंडियाची गोलंदाज निवडताना मोठी कसरत होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात कोणाला स्थान मिळते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode