विशाखापट्टणम, 12 ऑक्टोबर (हिं.स.)ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला विश्वचषक सामन्यात स्मृती मानधनाने आणखी एक विश्वविक्रम रचला. एका कॅलेंडर वर्षात १,००० एकदिवसीय धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. महिला एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ५,००० धावांचा टप्पा गाठणारी क्रिकेटपटूही ती बनली आहे.
१,००० धावा पूर्ण करण्यासाठी १८ धावांची आवश्यकता असताना, मानधनाने सोफी मोलिनेक्सच्या चेंडूवर षटकार मारून हा टप्पा पूर्ण केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मानधनाने एका कॅलेंडर वर्षात महिला फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला होता. मानधनाने आठव्या षटकात अयाबोंगा खाकाच्या चेंडूवर षटकार मारून १९९७ मध्ये बेलिंडा क्लार्कचा ९७० धावांचा विक्रम मागे टाकला. तिने ६२ धावा करून आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
स्मृती मानधना महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५,००० धावा पूर्ण करणारी पाचवी महिला क्रिकेटपटू आणि दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. मानधनाने ही कामगिरी 112 डाव आणि ५,५६८ चेंडू पूर्ण केली. ५,००० धावा पूर्ण करणारी ती सर्वात तरुण आणि सर्वात जलद क्रिकेटपटू ठरली आहे. तिने अनुक्रमे स्टेफनी टेलर (१२९ डाव) आणि सुझी बेट्स (६,१८२ चेंडू) यांना मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
मानधना ही मिताली राज नंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५,००० धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय क्रिकेटपटू आहे. या विक्रमानंतरही मानधनाची या विश्वचषकातील कामगिरी खराब राहिली आहे. तिने श्रीलंकेविरुद्ध फक्त ८, पाकिस्तानविरुद्ध २३ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २३ धावा केल्या होत्या.
स्मृती मानधनाची बॅट ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगलीच तळपली. तिने ४६ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह आपले
अर्धशतक पूर्ण केले. महिला विश्वचषक स्पर्धेतील मानधनाचे हे पहिले अर्धशतक आहे. स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८० धावांची खेळी खेळली. या खेळीत तिने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले आणि तिचा स्ट्राईक रेट १२१.२१ होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे