बीड, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।बीडसह महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन शासनाने ३१,६२८ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील सर्व पक्षी आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे साकडे घातले होते माजलगाव मतदारसंघात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर बागायती शेती करून उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हंगामी बागायती वर्गवारीनुसार मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीचा शासनाने सकारात्मक विचार करून निर्णय घेतला असून, आता अतिवृष्टीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ८,५०० रुपये ऐवजी प्रति हेक्टरी १७,००० रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच रब्बी हंगामात खत-बियाणे खरेदीसाठी प्रति हेक्टरी १०,००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण २७,००० रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.याचा थेट फायदा विहीर, पाईपलाइन, बोर किंवा कॅनॉलद्वारे बागायती शेती करणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होईल. अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्याचे कृषिमंत्री, कृषी राज्यमंत्री तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे आठवड्याभरापासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या अखंड प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis