बीड, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने व्यसनमुक्तीबाबत घटकसंच निर्मिती व वाचन साहित्य विकसित करण्याच्या दृष्टिने पाऊले उचलले असून शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचे वतीने राज्यस्तरीय व्यसनमुक्ती वाचन साहित्य व घटकसंच विकसन कार्यशाळेसाठी राज्यस्तरीय विशेष तज्ज्ञ समिती सदस्य म्हणून जिल्ह्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लऊळ क्र.१ येथील सहशिक्षक डॉ. राजकुमार तुकाराम राठोड यांची निवड करण्यात आली आहे.
सध्याच्या काळात व्यसन हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. विदयार्थी आणि युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. विदयार्थी आणि युवकांतील या वाढत्या व्यसनाच्या सवयीमुळे आरोग्य, कुटुंब, समाज पर्यायाने राष्ट्राचे मोठे नुकसान होत आहे. शाळा, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात व्यसन आणि व्यसनांचे दुष्परिणाम यांचा समावेश करण्याबाबत सूचित केलेले आहे. तद्नुषंगाने विदयार्थी आणि युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यसनमुक्ती या विषयाच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधनात प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय व्यसनमुक्ती वाचन साहित्य व घटकसंच विकसन निर्मिती करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने व्यसनमुक्ती वाचन साहित्य व घटक संच विकसन निर्मितीसाठी पहिली कार्यशाळा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे आयोजित करण्यात आलेली होती. या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी प्रशिक्षण परिषदचे संचालक राहुल रेखावार (भाप्रसे) व उपसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे, उपसंचालक अरुण जाधव अधिव्याख्याता शितल शिंदे, बाळासाहेब गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis