* आठपैकी केवळ एका जागेवर कुणालाही संधी; 4 खुल्या, 2 नामाप्र, एकेक एससी, एसटीसाठी
अमरावती, 15 ऑक्टोबर (हिं.स.)
आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये सभापतीपद महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले असून, आठपैकी केवळ एकाच जागेवर कोणत्याही संवर्गातील उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे. उर्वरित जागा विविध प्रवर्गांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
एकूण आठ जागांपैकी चार जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत, तर दोन जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) आणि प्रत्येकी एक जागा अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) साठी राखीव आहे. खुल्या प्रवर्गातील चारपैकी अंजनसिंगी, पिंपळखुटा आणि तळेगाव दशासर या तीन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे चिंचोली ही एकमेव जागा अशी आहे, जिथे कोणत्याही संवर्गातील पुरुष किंवा महिला उमेदवार निवडणूक लढवू शकतील.
नामाप्रसाठी राखीव असलेल्या दोन जागांमध्ये निंभोरा-बोडखा आणि मंगरुळ दस्तगीर यांचा समावेश आहे. यापैकी मंगरुळ दस्तगीरची जागा महिलेसाठी राखीव असल्याने तेथे पुरुष उमेदवाराला संधी मिळणार नाही. अनुसूचित जातीसाठी जुना धामणगाव, तर अनुसूचित जमातीसाठी शेंदुरजनाखुर्द हे मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही जागांवर पुरुष आणि महिला असे दोन्ही उमेदवार निवडणूक लढवू शकतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी