अमरावती, 15 ऑक्टोबर (हिं.स.) | अमरावती महानगरपालिका आणि विधिमंत्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत सांस्कृतिक भवन, अमरावती येथे “दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन” या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले आहे.
सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनी, हस्तकला व बचत गटांचे स्टॉल्स, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच स्थानिक कलाकारांचे सादरीकरण असे विविध आकर्षक उपक्रम ठेवण्यात आले आहेत. शहरातील नागरिक, विद्यार्थी, छायाचित्रकार, महिला बचत गट, व्यापारी व तरुणांसाठी हा उत्सव एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरणार आहे.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, “दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे, आणि या आनंदोत्सवाच्या माध्यमातून शहरातील नागरिक एकत्र येऊन संस्कृती, कला आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करतील. नागरिकांनी परिवारासह उपस्थित राहून या उपक्रमाला यशस्वी करावे, ही मनापासून विनंती आहे.”या कार्यक्रमाचे उद्घाटन १६ ऑक्टोबर रोजी दुपारी भव्य सोहळ्यात होणार असून, २१ ऑक्टोबर रोजी समारोप आणि विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
अमरावती महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांना या दिवाळी आनंदोत्सवात सहभागी होण्याचे आणि शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी