इंद्रनील नाईक गोंदियाचे नवे पालकमंत्री!
बाबासाहेबांचा तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा मुंबई, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव गोंदियाच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची नियुक्ती कर
बाबासाहेब पाटील व इंद्रनील नाईक


बाबासाहेबांचा तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा

मुंबई, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव गोंदियाच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली वरळी येथे पार पडलेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी नागपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात खासदार प्रफुल पटेल यांनी विदर्भातील पालकमंत्र्यांवर थेट टीका केली होती. पालकमंत्री वर्षातून केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच जिल्ह्यात दिसतात, असा आरोप करत त्यांनी उपस्थितांना जोरदार धक्का दिला होता. याच टीकेनंतर गोंदियाच्या पालकमंत्रिपदात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती, जी आता प्रत्यक्षात उतरली आहे.

तब्येतीमुळे पाटील यांचा राजीनामा मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पाटील यांनी मंगळवारी आपल्या तब्येतीचे कारण देत गोंदियाच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी त्यांच्या गुडघ्याचे शस्त्रक्रिया करण्यात आली होती, आणि सातत्याने पायाच्या त्रासामुळे त्यांना लांबचा प्रवास करणे कठीण जात होते. त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे पालकमंत्रीपदाची धुरा आता इंद्रनील नाईक यांच्या हाती देण्यात आली आहे. विदर्भातीलच मंत्री असलेल्या नाईक यांना जिल्ह्यात नियमितपणे येणे शक्य होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गोंदिया जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी ही नियुक्ती फलदायी ठरेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

पालकमंत्री पदासाठी सुरूच होती रस्सीखेच

सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीपासूनच बाबासाहेब पाटील आणि हसन मुश्रीफ हे दोघेही आपापल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत, अशी मागणी करत होते. मात्र ती मागणी पूर्ण झाली नव्हती. यामुळे दोघांमध्ये नाराजीचं वातावरण होते. यापूर्वी हसन मुश्रीफ यांनी देखील विदर्भातील एका जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडले होते, आणि आता बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्रिपद सोडल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या प्रशासनात आणि विकासाच्या दृष्टीने हा बदल निर्णायक ठरू शकतो. इंद्रनील नाईक यांच्या रूपाने जिल्ह्याला कार्यरत पालकमंत्री मिळाले असून, स्थानिक स्तरावर विकास कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande