अमरावती, 15 ऑक्टोबर (हिं.स.) | महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या वतीने दिवाळी महोत्सवानिमित्त ‘मेळघाट हाट’, सायन्सस्कोर मैदान येथे भरविण्यात आलेल्या भव्य विक्री व प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महोपात्र यांच्या हस्ते झाले. महिला बचत गटांनी तयार केलेला दिवाळी फराळ, खाद्यान्ने खरेदी करुन त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संजीता महोपात्र यांनी केले.
महा एफ.पी.सी.संचालक सुधीर इंगळे, माविमचे विभागीय सल्लागार केशव पवार, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार पवन देशमुख, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखेडे तसेच शासकीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यात जिल्ह्यातील विविध महिला बचत गट यांच्याकडून हस्तनिर्मित उत्पादने, स्थानिक खाद्यपदार्थ, दिवाळी फराळ, सजावटीच्या वस्तू, कापड, सुगंधी अगरबत्ती, तसेच ग्रामीण भागातील पारंपरिक कलाकृती यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. महिलांच्या कष्टातून आणि कौशल्यातून घडविलेल्या या वस्तूंना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी आपल्या घरासाठी व दिवाळी भेटवस्तूसाठी महिला उद्योजिकांच्या उत्पादनांची खरेदी करून ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला हातभार लावला आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत 19 ऑक्टोबरपर्यंत मेळघाट हाट येथे भरविण्यात आलेल्या या दिवाळी विशेष विक्री व प्रदर्शनास भेट देवून महिला उद्योजकांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावे. या माध्यमातून ‘आत्मनिर्भर महिला - सशक्त समाज’ हा संदेश दिला जाईल, असे आवाहन डॉ. रंजन वानखेडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी