बंद घरावर चोरट्यांचा डल्ला ; ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास
जळगाव , 16 ऑक्टोबर (हिं.स.)जळगाव शहरातील वाघ नगर परिसरात राहणाऱ्या एका डॉक्टरच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर आणि राऊटर असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आल
बंद घरावर चोरट्यांचा डल्ला ; ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास


जळगाव , 16 ऑक्टोबर (हिं.स.)जळगाव शहरातील वाघ नगर परिसरात राहणाऱ्या एका डॉक्टरच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर आणि राऊटर असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी दुपारी साडेतीनच्या सुमारास लक्षात आली. वाघ नगर परिसरात डॉ. पुरुषोत्तम भगवान पाटील (वय ४०) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून वैद्यकीय व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करतात. १३ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ते कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी संधी साधत त्यांच्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश करून घरातील सोन्याच्या वस्तू, सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर व राऊटर असा अंदाजे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस नेला. घरी परतल्यावर दरवाजाचे कुलूप तुटलेले व वस्तू गायब असल्याचे लक्षात येताच डॉ. पाटील यांनी तत्काळ जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार गुलाब माळी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. शहरात काही दिवसांपासून बंद घरांवरील चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून चोरट्यांचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande