कोके येथे तीव्र अतिसाराचा उद्रेक; परिस्थिती नियंत्रणाखाली – जिल्हाधिकारी चव्हाण
परभणी, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील कोके गावात तीव्र अतिसार रोगाचा उद्रेक झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून, जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाल
कोके येथे तीव्र अतिसाराचा उद्रेक; परिस्थिती नियंत्रणाखाली – जिल्हाधिकारी चव्हाण


परभणी, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।

जिंतूर तालुक्यातील कोके गावात तीव्र अतिसार रोगाचा उद्रेक झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून, जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

सदर प्रकरणात १३९ रुग्णांना ग्रामस्तरावर ओपीडीमध्ये उपचार देण्यात आले आहेत, तर ग्रामीण रुग्णालय, बोरी येथे ७७ रुग्ण दाखल करण्यात आले होते. यापैकी ६६ रुग्णांना पूर्णपणे बरे होऊन सुट्टी देण्यात आली असून, ११ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे. संदर्भित रुग्णांपैकी २ जण जिल्हा रुग्णालय, परभणी येथे दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

प्राथमिक तपासणीनुसार पिण्याच्या पाण्याचे दूषितीकरण हे संभाव्य कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. आरोग्य विभागाने ५ पाणी नमुने, ५ विष्ठा (स्टूल) नमुने आणि टीसीएल पावडर नमुना तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच, गावात क्लोरीनेशन, स्वच्छता आणि जनजागृती मोहिम सुरू करण्यात आली आहे.

या परिस्थितीचा आढावा घेत मेघनाताई साकोरे-बोर्डीकर, आरोग्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य यंत्रणांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली असून, प्रशासन सर्व घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सुरक्षित पाणी वापरणे, स्वच्छता राखणे आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.”

जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून सर्व प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून, कोके गावातील परिस्थिती पूर्णतः स्थिर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande