परभणी, 17 ऑक्टोबर (हिं.स.) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ’ अंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात शारदा महाविद्यालय, परभणीची विद्यार्थिनी प्रियंका अवचार हिने लावणी या कलाप्रकारात सुवर्णपदक पटकावत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रियंका अवचार हिचा, तिच्या सहकलाकारांचा आणि मार्गदर्शकांचा शारदा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन पवार हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. किरणताई गारोळे, प्रा. टी. आर. हूरगुळे आणि श्री बापू जाधव उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. पवार म्हणाले, “शारदा महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. ज्ञानोबा मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी प्रियंका अवचार हिने लावणी कलाप्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले, हा संपूर्ण महाविद्यालयाचा अभिमानाचा क्षण आहे. सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना कलागुणांच्या विकासासाठी महाविद्यालयाकडून सर्वतोपरी सहाय्य दिले जाईल.” त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक, कलात्मक आणि सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात लावणी स्पर्धेत सहभागी झालेले आणि यशस्वी ठरलेले कलाकार भूषण गाडे, श्वेता साखरे, गायत्री साखरे, गंगाप्रसाद सामाले, रमेश गायकवाड, हरिभाऊ कदम यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे, डॉ. काजी कलीमोद्दीन, डॉ. स्वाती कुलकर्णी, श्री. सुरेश जयपुरकर यांच्या मार्गदर्शनाचा विशेष उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रा. डॉ. नितीन बावळे, डॉ. संतोष नाकाडे, तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रियंका अवचार आणि तिच्या टीमला सांस्कृतिक विभागातील डॉ. नवनाथ सिंगापुरे, डॉ. अंजली शिंदे, डॉ. उज्वला जगताप आदींचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. नितीन बावळे यांनी मानले.
संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी भविष्यात आणखी अधिक विद्यार्थी सांस्कृतिक क्षेत्रात चमकतील, असा विश्वास व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis