नाशिक, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
गोदाघाट परिसरातील दुतोंडी हनुमानाजवळील अमृततुल्य चहाच्या शटरजवळ झोपलेल्या वैभव नरवाडे या युवकावर रविवारी पहाटे दोघांनी कोयत्याने वार केले. नरवाडे हा मरण पावल्याचे समजून हल्लेखोर पसार झाले. मात्र सुदैवाने त्याचे प्राण वाचले असून उपचार सुरू आहेत.
शहरातील नामचिन गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी कठोर पावले उचललेली असताना आता नवीन चेहरे समोर येत आहेत. ही गुन्हेगारांची नवी ‘मोडस् अॉपरेंडी’ मानली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव नरवाडे (२६, रा. तारवाला नगर, लामखेडे मळा, पिंपळेश्वर महादेव मंदीराचे बाजुला, दिंडोरी रोड) हा युवक रविवारी मध्यरात्री दुतोंड्या मारूती जवळील अमृततुल्य चहाच्या दुकानाजवळील शटरजवळ झोपला होता. पहाटे दोन वाजेच्या सुमारास त्याच्या डोक्यावर जोरात घाव घातला गेला. त्यामुळे जाग आलेल्या नरवाडेने पाहिले असता रोशन चारोस्कर याच्या सोबत काम करणारे कृष्णा पांडे आणि साथीदाराच्या हातात कोयते दिसले. नरवाडे जागा झाल्याचे पाहून दोघांनी कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. त्याच्या प्रतिकारास न जुमानता उजव्या हातावर, डाव्या पायावर वार केले. त्यानंतर नरवाडे मेला आहे, असा समज झाल्याने हल्लेखोर पळून गेले.
गोदाघाटावर घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, सहायक सतिष शिरसाठ, उपनिरीक्षक पंकज सोनवणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन जखमी नरवाडे यास रुग्णालयात हलवले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा पांडेसह दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV