अमरावती, 20 ऑक्टोबर (हिं.स.)
रहाटगाव परिसरात उघडकीस आलेल्या बनावट चलनी नोटांच्या प्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी रविवारी आणखी दोन संशयितांना अटक करून ५७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून, या रॅकेटचा मास्टरमाईंड अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यासाठी वेगाने तपास सुरू आहे.अटक करण्यात आलेले आरोपी आदित्य रामेकर (रा. समर्थवाडी, रहाटगाव) व यश सतीश बर्वे (रा. दत्तवाडी, रहाटगाव) हे असून, आदित्य रामेकर याच्याकडून तब्बल ४८ हजार रुपयांच्या, तर यश बर्वे याच्याकडून ९ हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या आधी पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून काही प्रमाणात बनावट चलनी नोटा जप्त केल्या होत्या. या सलग कारवायांमुळे रहाटगाव परिसरातील बनावट नोटांच्या अवैध व्यवहारांवर पोलिसांनी मोठा आळा घातला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, या आरोपींनी बनावट नोटा स्थानिक बाजारात आणि किरकोळ व्यवहारांमध्ये वापरून चलनात आणण्याचा प्रयत्न केला होता.बनावट नोटा बनविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून मोठे रॅकेट समोर येण्याची दाट शक्यता वर्तविला जात आहे. सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, मा. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, तसेच मा. सपोआ कैलास पुंडकर (फ्रेजरपुरा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पोहेकॉ राजाभाऊ राऊत, पोकॉ राजीक खान, पोकॉ निलेश साविकार, पोकॉ राजा सय्यद, पोकॉ वैभव तिखीले आणि पोकॉ अमित ढोले यांनी विशेष परिश्रम घेतले.या सलग आणि प्रभावी कारवायांमुळे शहरात चलनात असलेल्या बनावट नोटांच्या प्रसारावर आळा बसला असून,याप्रकरणी प्रत्येक हालचालीवर तसेच संशयितांवर देखील पोलीस नजर ठेवून आहेत.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असून बनावट नोटा नेमक्या कोठे आणि कशा पद्धतीने तयार केल्या जातात, याचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीतून असे संकेत मिळाले आहेत की या मागे एक संगठित टोळी कार्यरत आहे. लवकरच या रॅकेटचा मास्टरमाईंड हाती लागेल.पोलीस या प्रकरणी गंभीरतेने कारवाई करत असून हे संपूर्ण रॅकेट लवकरच जेरबंद असेल.
दिनेश दहातोंडेवरिष्ठ पोलीस निरीक्षकपोलीस स्टेशन नांदगाव पेठ
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी