रायगड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
चेंढरे ग्रामपंचायतीमध्ये गेल्या सात ते आठ दिवसांपासून पाण्याचा पुरवठा अनियमित असून अनेक भागांमध्ये तो पूर्णतः बंद आहे. दिवाळीसारख्या महत्वाच्या सणाच्या काळातही नागरिकांना पाण्यासाठी झगडावे लागत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
सध्या चेंढरे ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना त्यांच्या अडचणींसाठी कुणाकडे जायचे, आपली समस्या कुणापर्यंत मांडायची हे समजेनासे झाले आहे. अनेक नागरिकांनी त्यांच्या स्थानिक सदस्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु सदस्यांकडेही काही उपाय नसल्यामुळे ते हात झटकताना दिसत आहेत.
ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रणिता म्हात्रे (माजी उपसरपंच) यांनी सांगितले की, “ प्रल्हाद म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला आहे. मात्र, आज रात्रीपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. लवकरच हंडा मोर्चा काढण्यात येईल.”
दिवाळीच्या सणात पाण्याविना होणारे हाल, अंघोळीपासून स्वयंपाकापर्यंत प्रत्येक कामावर परिणाम करत आहेत. पाणी हा मूलभूत हक्क असूनही, अशा सणासुदीच्या काळातही नागरिकांना पाण्यासाठी हाकाटी मारावी लागते हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे. अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात जातील, हे निश्चित मानावे लागेल.
----
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके