रायगड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
सिडकोच्या वसाहती भागांतील वाढती पाणीटंचाई लक्षात घेता, जोपर्यंत पाणीपुरवठ्यात सुधारणा होत नाही, तोपर्यंत नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना सीसी/ओसी मंजुरी देऊ नये, अशी स्पष्ट मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.
पावसाळ्यात सर्व धरणे भरलेली असताना देखील खारघर, कामोठे, तळोजा, नवीन पनवेल या भागात पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे सिडकोच्या नियोजनशून्य कारभारावर आमदार ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाणी विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व मनमानी वर्तणूक यामुळे नागरिक त्रस्त असून, सिडको अधिकारी जबाबदारी झटकून बेफिकीरपणे वागत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
“दिवाळीसारख्या सणाच्या काळातही नागरिकांना पाण्यासाठी झगडावे लागत आहे. पाणीटंचाईमुळे सिडकोविरोधात प्रचंड असंतोष आहे. जर तातडीने सुधारणा न केल्यास, लोकप्रतिनिधी म्हणून मी नागरिकांना घेऊन सिडकोविरोधात तीव्र आंदोलन छेडेन,” असा इशाराही आमदार ठाकूर यांनी दिला.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर वाटपातही मनमानी सुरू असून, काही अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. पाणीपुरवठा विभागाचे स्वयंचलन, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि प्रकल्प मंजुरी थांबवण्याची मागणी त्यांनी सिडको प्रशासनाकडे पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे.
You said:
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके