नंदुरबार, 20 ऑक्टोबर (हिं.स.) चांदसैली घाटात झालेल्या भीषण अपघातानंतर आज राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल जखमींची भेट देऊन त्यांची विचारपूस केली. या वेळी त्यांनी जखमींना सर्वतोपरी उपचार मिळावेत यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चांदसैली घाटात पिकअप गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले असून काहींचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी तीव्र दु:ख व्यक्त करत मृत्यूमुखी पडलेल्या माता-भगिनींप्रती संवेदना प्रकट केल्या. अपघातानंतर पालकमंत्री कोकाटे यांनी आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन जखमी नागरिकांची प्रकृती जाणून घेतली. रुग्णालयातील डॉक्टर व अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांनी सर्व जखमींना आवश्यक औषधे, रक्तपुरवठा आणि तातडीचे उपचार त्वरित उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी सामान्य रुग्णालयातील अधिकारी, आरोग्यकर्मी, रूग्णांचे नातेवाईक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या वेळी पालकमंत्री म्हणाले, “ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत, त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत मिळावी, यासाठी शासन-प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून या कठीण प्रसंगात राज्य शासन त्यांच्या सोबत ठामपणे उभं आहे.” या घटनेनंतर जिल्हा प्रशासन, पोलीस, व आरोग्य विभागाकडून तत्परतेने बचावकार्य करण्यात आले. जखमींना सुरक्षितरित्या हलवून वैद्यकीय उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाकडून अपघातग्रस्त कुटुंबांना सर्वतोपरी मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर