नंदुरबार, 20 ऑक्टोबर (हिं.स.) “निःस्वार्थ भावनेने समाजाच्या सुरक्षेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या पोलीस बांधवांचे शौर्य, त्याग आणि सेवा भाव हेच त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख आहे. त्यांचा त्याग व्यर्थ जाऊ नये, त्यांच्या कार्याची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी हे स्मारक उभारले आहे,” असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक व औकाफ मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. नंदुरबार येथे उभारण्यात आलेल्या पोलीस शहीद स्मारकाचे अनावरण त्यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस. अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, डॉ. अभिजित मोरे, प्रतिभा शिंदे अन्य अधिकारी व नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, “कर्तव्य पार पाडताना अनेक पोलीस बांधवांनी मृत्यूला सामोरे जात समाजाचे रक्षण केले. त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी उभारलेले हे स्मारक जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि पोलीस दलासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल.” त्यांनी पुढे सांगितले, “संरक्षण ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. देशाबाहेरील सीमांचे रक्षण सैनिक करतात तसेच देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी पोलीस दल पार पाडते. सामाजिक सुरक्षेसाठी पोलीस दल हेच विश्वासाचे प्रतीक आहे “पोलीस बांधवांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देऊ” मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, “ज्या शहीदांनी प्राणार्पण केले त्यांची स्मारके निर्माण केलीच पाहिजेत, परंतु जे आजही दिवस-रात्र कर्तव्य बजावत आहेत त्यांच्यासाठीही चांगल्या सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या सर्व सुविधांसाठी भरीव तरतूद केली जाईल. त्याग,आदर आणि सेवाभावाचे स्फूर्तीस्थान म्हणजेच हे पोलीस शहीद स्मारक. नंदुरबार पोलीस दलाच्या प्रत्येक सदस्यासाठी हे स्मारक अभिमानाचे आणि जनतेसाठी विश्वासाचे प्रतीक ठरेल,”असा विश्वासही यावेळी पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी व्यक्त केला. शहिद पोलीस अधिकारी आणि जवान स्मारकाच्या रूपाने सदैव जिवंत राहतील -श्रवण दत्त एस. यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले, अनेक पोलीस बांधवांनी कर्तव्य बजावताना प्राणाची आहुती दिली आहे. दहशतवाद, नक्षलवाद, दंगल, पुर, आगी, अपघात, चक्रीवादळ प्रत्येक संकटात पोलीस दलाने स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासातही अनेक पराक्रमी अधिकारी आणि जवान आहेत हे सारे स्मारकाच्या रूपाने सदैव जिवंत राहतील. त्यांच्या बलिदानामुळे आज भारत अधिक सुरक्षित आहे. आणि म्हणूनच 21 ऑक्टोबरला प्रत्येक पोलीस मुख्यालयात, जिल्हा पोलीस कार्यालयात आणि स्मारकांवर त्यांच्या नावाने “शहीद पोलिसांना अभिवादन समारंभ” आयोजित केला जातो. जेव्हा एखादा पोलीस अधिकारी शहीद होतो, तेव्हा त्याचं कुटुंबही त्याच्यासोबतच भावनिक, सामाजिक आणि मानसिक स्तरावर बलिदान देतं एका मुलाला वडिलांशिवाय मोठं व्हावं लागतं, एका पत्नीला पतीच्या आठवणींनी आयुष्य व्यतीत करावं लागतं, एका आईला दरवर्षी पोलीस स्मृती दिनी त्या मुलाच्या नावाचं स्मारक पाहून अभिमानासह डोळ्यात अश्रू येतात. ही कुटुंबं राष्ट्राची खरी निःशब्द नायक आहेत. त्यांच्यामुळेच पोलीस दल अधिक मजबूत उभं राहतं, असे सांगून त्यांनी या पोलीस शहिद स्मारकासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 30 लाख रूपये दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री व जिल्हा नियोजन समितीचे यावेळी आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर