सोलापूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
जिल्ह्यातील ४ माजी आमदार लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत परंतु या पक्षप्रवेशामुळे स्थानिक भाजपात दुफळी माजली आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले. भाजपा नेते सुभाष देशमुख यांनी या पक्षप्रवेशावर भाष्य करत बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावे त्यानंतर पक्षाने त्यांना जबाबदारी द्यावी असं विधान केले आहे.
सुभाष देशमुख म्हणाले की, पक्षात येणाऱ्यांचे सर्वांचे स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात वाढली पाहिजे या भूमिकेचा मी आहे. परंतु हे करत असताना सर्वांनी एकमेकांना विश्वासात घेणे गरजेचे असते. स्थानिकांची काय भूमिका आहे हे विचारून घेतले पाहिजे. जे लोक नव्याने येत आहेत त्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचे काम करावे मग पक्षाने त्यांना भूमिका द्यावी त्यात काही अडचण नाही. आज जे येत आहेत ते सर्वजण पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून येत आहेत. उद्या जर पंचायत समितीत, जिल्हा परिषदेत भाजपाच्या जास्तीत जास्त जागा आल्या त्यात मोठा गट तयार होईल. त्यात आजी-माजी आमदार सर्व एकत्र येत भाजपाचा जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ देतील की नाही यात शंका आहे असं त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड