आनंदराज आंबेडकरांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत
रायगड, 26 ऑक्टोबर (हिं.स.)। रिपब्लिकन सेना पक्षाचे सर्वेसर्वा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये थेट रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पनवेल येथे आयोजित पक्षप्रवेश व मार्गदर्शन शिबिरात त्या
वंचितांच्या ‘एकला चलो रे’ भूमिकेवर टोला; आंबेडकरांचा स्वतंत्र वाटचालीचा संकेत


रायगड, 26 ऑक्टोबर (हिं.स.)।

रिपब्लिकन सेना पक्षाचे सर्वेसर्वा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये थेट रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पनवेल येथे आयोजित पक्षप्रवेश व मार्गदर्शन शिबिरात त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

नवीन पनवेल येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने आयोजित या शिबिरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. अनेक महिला आणि तरुणांनी या वेळी उत्साहाने पक्षप्रवेश केला.

या पार्श्वभूमीवर बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, “आतापर्यंत आपण वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला, पण त्यांच्या ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होत आहे. त्यामुळे आता प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःसाठी आणि समाजासाठी तयारीला लागले पाहिजे.”

त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे महत्त्व स्पष्ट करत सांगितले की, “रिपब्लिकन सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे एक तोफ आहे. बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून आपण जनतेच्या घराघरात पोहोचलो आहोत. आता ही ऊर्जा निवडणुकीच्या मैदानात उतरवायची वेळ आली आहे.”

आगामी निवडणुकीत रिपब्लिकन सेना किती आणि कुठल्या ठिकाणांहून उमेदवार उभे करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. या कार्यक्रमाला रायगड जिल्हाध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रीय सरचिटणीस संजीवन बावंधनकर, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष गाडे, कोकण प्रदेशाध्यक्ष विनोद मोरे, विद्यार्थी सेना रायगड जिल्हाध्यक्ष राहुल गायकवाड, युवा सेना जिल्हाध्यक्ष वैभव गवळी, सरचिटणीस पंचशील सिरसाट, तसेच पनवेल तालुका युवा अध्यक्ष शुभम रुके आणि खांदा कॉलनी अध्यक्ष रोशन कासारे उपस्थित होते.

या वेळी रिपब्लिकन सेना आणि बौद्धजन पंचायत समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ज्यामुळे पनवेल परिसरात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल लागली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande