
रायगड, 26 ऑक्टोबर (हिं.स.)। तालुक्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडवणारी घडामोड रविवारी घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंचायत उपसभापती शैलेश विठोबा सलागरे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून पोलादपूरच्या राजकारणात खळबळ उडवली. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, शिवसेनेला नवे बळ प्राप्त झाले आहे.
नवीन राजकीय वाटचालीसाठी प्रेरणा देताना सलागरे यांनी सांगितले की, “नामदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आणि शिवसेनेच्या विचारधारेतून जनतेची सेवा करण्यासाठी मी हा निर्णय घेतला.” या प्रसंगी सलागरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच अनेक गावांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, अनिल दळवी, नगरसेवक सिद्धेश शेठ, भरत चोरगे, स्वप्निल चोरगे, माजी तालुका प्रमुख अंकुश सकपाळ, विभाग प्रमुख तानाजी निकम, तसेच ग्रामपंचायत सरपंच आदिती मोरे, उपसरपंच जितेंद्र सकपाळ आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रवेशामुळे पोलादपूर तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षात प्रवेशानंतर सलागरे यांना कोणती जबाबदारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पोलादपूर तालुक्यात शिवसेनेचा झेंडा आणखी उंचावेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके