
रायगड, 26 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यात आज मुंबईसह कोकण आणि काही पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, शेतकऱ्यांचे भात पीक पावसामुळे बुडालेले आहे, ज्यामुळे त्यांच्या चिंता आणि आर्थिक नुकसानीत भर पडली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये, विशेषतः कर्जत ,खालापूर, खोपोली रायगड जिल्ह्यात तसेच मालाड पश्चिम, बांद्रा, अंधेरी आणि जुहू परिसरात सतत पावसाच्या सरी कोसळत आहेत. परिणामी प्रवाशांना संथ वाहतुकीचा सामना करावा लागत आहे, तर अनेक रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी साचले आहे. उष्णतेपासून नागरिकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी शहरात वाहतुकीत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
कोंकणात भात कापणीच्या सत्रात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यातील वलाट पट्टा, मळे आणि इतर ठिकाणी शेतकऱ्यांचे कापलेले पीक पावसात भिजल्यामुळे ढसाढसा रडत आहेत. झोडणी आणि इतर शेतीच्या कामातही मोठा अडथळा निर्माण झाला आहे. भात कापून शेतातच ठेवण्यात आलेल्या पिकांवर पावसामुळे गंभीर परिणाम झाले आ हेत.
हवामान विभागाने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. कालही राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती, आता पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामुळे शहरी नागरिकांना उकाड्यापासून आराम मिळाला असला तरी, शेतकऱ्यांसाठी चिंता कायम आहे. येत्या दिवसांत पावसाची स्थिती आणि शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल की नाही, हे हवामान आणि प्रशासनाकडे लक्ष देण्यासारखे ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके