
लातूर, 26 ऑक्टोबर, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात तिर्रट जुगार खेळणाऱ्या ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेकडून रोजी मौजे निटूर, ता. शिरूर अनंतपाळ येथील एका शेतावर छापा टाकून तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, निटूर ते राठोडा जाणाऱ्या रस्त्यावरील सिद्धेश्वर सोमवंशी यांच्या शेतातील पत्र्याच्या शेड मध्ये काही व्यक्ती तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरून पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.
छापेमारीदरम्यान तेथे उपस्थित आठ इसम जुगार खेळताना व खेळवताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल, मोटरसायकल असा एकूण 02 लाख 95 हजार 630 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपींविरुद्ध कलम १२(अ), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
वरील सर्व आरोपी बेकायदेशीरपणे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तिर्रट जुगार खेळत व खेळवीत असताना आढळले. त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, जप्त केलेला सर्व मुद्देमाल पुढील तपासासाठी जमा करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पथकातील पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर,अर्जुन रजपूत, मनोज खोसे, जमीर शेख यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis