
वेलिंग्टन, 26 ऑक्टोबर (हिं.स.)न्यूझीलंडने मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ४ विकेट्सने पराभव केला. या विजयासह किवीज संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. माउंट मौंगानुई येथील बे ओव्हल येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संघ ३५.२ षटकांत २२३ धावांवर सर्वबाद झाला. कर्णधार हॅरी ब्रूकने सर्वाधिक १३५ धावा केल्या. तर झाचेरी फॉल्क्सने ४ विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडच्या फलंदाजांनी २२४ धावांचे लक्ष्य ३६.४ षटकांत ६ विकेट्समध्ये पूर्ण केले. डॅरिल मिशेलने नाबाद ७८ धावा केल्या, तर मायकेल ब्रेसवेल ५१ धावांवर धावबाद झाला. कर्णधार सँटनरने २७ धावांचे योगदान दिले आणि टॉम लॅथमने २४ धावा केल्या. ब्रायडन कार्सने ३ विकेट्स घेतल्या.
२२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. संघाने २४ धावांत त्यांचे पहिल्या तीन विकेट्स गमावल्या होत्या. विल यंग (५), केन विल्यमसन (०) आणि रचिन रवींद्र (१७) पॅव्हेलियनमध्ये परतले. दुसऱ्या षटकात ब्रायडन कार्सने विल यंग (५) आणि केन विल्यमसन (०) यांना बाद करून दबाव वाढवला. त्यानंतर, पाचव्या षटकात, मार्क वूडने रचिन रवींद्रला बाद केले, जो फक्त १७ धावा करू शकला. त्यानंतर कारने टॉम लॅथम (२४ धावा) ला एलबीडब्ल्यू बाद केले.
इंग्लंडच्या ११ फलंदाजांपैकी नऊ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. संघाच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी एकत्रितपणे फक्त चार धावा केल्या. वरच्या फळीच्या अपयशानंतर, जोश बटलर आणि सॅम करन मधल्या फळीत डावाला बळकटी देण्यात अपयशी ठरले. बटलरने चार आणि करनने सहा धावा केल्या. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज झॅकॅरी फॉल्क्सने डकेट, रूट, बेथेल आणि करन यांना बाद करत चार विकेट्स घेतल्या. जेकब डफीने तीन आणि मॅट हेन्रीने दोन विकेट्स घेतल्या.
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. संघाच्या आघाडीच्या तीन फलंदाजांनी फक्त दोन धावा केल्या. मॅट हेन्रीने पहिल्याच चेंडूवर जेमी स्मिथला बाद केल्याने संघाला पहिला धक्का बसला. स्मिथ धावा करू शकला नाही. डावाच्या दुसऱ्या षटकात झॅकॅरी फॉल्क्सने बेन डकेट आणि जो रूटला बाद केले. दोघांनीही प्रत्येकी २ धावा केल्या. यानंतर कर्णधार हॅरी ब्रुकने जबाबदारी घेतली आणि धावसंख्या २२३ वर नेली. त्याने आणि जिमी ओव्हरटनने ८७ चेंडूत सातव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. ब्रुकने १०१ चेंडूत १३५ धावा केल्या. ब्रुकच्या खेळीत ९ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे