
अकोला, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी,व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली ‘गतिशक्ती अभियान’ अंतर्गत विदर्भातील रेल्वे विकासाला नवे बळ मिळत आहे.या अभियानांतर्गत बडनेरा-अकोला रेल्वे विभागासाठी ₹६१.८१ कोटींचा आणि अकोला-भुसावळ विभागासाठी ₹१०२ कोटींचा फेन्सिंग टेंडर मंजूर झाला असून सदर काम १२ महिन्या मध्ये पूर्ण होणार आहे.हा निर्णय अकोला व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.
या प्रकल्पांच्या माध्यमातून रेल्वे प्रवास अधिक गतिमान, सुरक्षित व सोयीस्कर होणार आहेत, यामुळे नव्या तंत्रज्ञानावर आधारित गाड्या १५० ते १६० किमी प्रतितास वेगाने धावू शकतील व प्रवास वेगवान होणार आहे.अकोला-वर्धा सेक्शनमध्ये तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकचे काम सुरू आहे, तसेच भुसावळ-अकोला आणि अकोला-वर्धा या दोन्ही मार्गांवरील चालू प्रकल्पांमुळे रेल्वे वाहतूक अधिक सुलभ व कार्यक्षम होत आहे. यासोबतच अकोला-वाशीम-नांदेड या सेक्शनमधील सिंगल ट्रॅकचे डबलिंगचे कामही हाती घेण्यात येत आहे, ज्यामुळे मराठवाडा व विदर्भाचा रेल्वे संपर्क अधिक बळकट होईल.या सर्व प्रकल्पांमुळे अकोला व वाशीम जिल्ह्यांतील प्रवाश्यांना,तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळण्यास मदत होईल, तसेच या भागातील उद्योगधंद्यांना आणि गुंतवणुकीला नवी चालना मिळेल.या ऐतिहासिक मंजुरीबद्दल खासदार मा. अनुप संजय धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत आणि सांगितले की, “ही मंजुरी म्हणजे विदर्भातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विकासाचा वेग वाढवणारा नवा टप्पा आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे