
परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। अयशस्वी ठरलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेविरोधात पीडित पतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण सुरु केले आहे. परभणी तालुक्यातील पेडगाव येथील मारोती रतन शेळके यांच्या पत्नीवर पेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, शस्त्रक्रियेनंतर एक वर्षांनी पत्नीस गर्भधारणा होऊन पोटात रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला. या घटनेमुळे चुकीची आणि अयशस्वी शस्त्रक्रिया केल्याचा आरोप संबंधित वैद्यकीय अधिकार्यावर करण्यात आला आहे. दोषींवर निलंबन व गुन्हा दाखल करावा, तसेच पीडित कुटुंबाला शासन नियमांनुसार मदत मिळावी, या मागण्यांसाठी मारोती शेळके यांनी आजपासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण सुरू केले .
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख व मनोज राऊत यांनी उपोषण स्थळी भेट देऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व आंदोलक मारोती शेळके यांच्यात चर्चा घडवून आणली. चर्चेत दोषी अधिकार्यांवर कार्यवाही करण्याबाबत आणि पीडित कुटुंबाला शासन नियमांनुसार तातडीने मदत देण्याचे लेखी आश्वासन उद्या देण्याचे मान्य करण्यात आले आहे. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन पुढे सुरू ठेवायचे की थांबवायचे याबाबतचा निर्णय उद्या घेण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis