जळगाव - धावत्या रेल्वेसमोर रील बनवणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू
जळगाव , 27 ऑक्टोबर (हिं.स.) मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात धावत्या रेल्वेसमोर स्टंट करणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले. पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसच्या धडकेत दोन १८ वर्षीय मित्रांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेन
जळगाव - धावत्या रेल्वेसमोर रील बनवणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू


जळगाव , 27 ऑक्टोबर (हिं.स.) मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात धावत्या रेल्वेसमोर स्टंट करणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले. पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसच्या धडकेत दोन १८ वर्षीय मित्रांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने पाळधी परिसरात शोककळा पसरली आहे. मयत तरुणांची नावे प्रशांत पवन खैरनार आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (दोघेही वय १८, रा. महात्मा फुले नगर, पाळधी) अशी आहेत. दोघेही मैत्रीपूर्ण आणि मनमिळाऊ स्वभावासाठी परिचित होते. रविवारच्या सुट्टीदिवशी हे दोघे पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळील रेल्वे ट्रॅकवर आले होते.

सोशल मीडियासाठी आकर्षक आणि साहसी रील बनवण्याच्या प्रयत्नात ते धावत्या रेल्वेसमोर धोकादायक पद्धतीने व्हिडिओ शूट करत होते. याचवेळी धरणगावकडून जळगावकडे जाणाऱ्या अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसने त्यांना जोरदार धडक दिली. रेल्वेचा प्रचंड वेग आणि अपघाताची तीव्रता यामुळे दोघांना वाचण्याची संधीच मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनाम्याची कार्यवाही सुरू केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर मोठा आघात झाला असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande