
जळगाव , 28 ऑक्टोबर (हिं.स.) | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील निवास्थानी चोरटयांनी डल्ला मारला आहे. या घरफोडीच्या घटनेमुळे जळगावसह संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरट्यांनी घरातून काय काय चोरी केली आहे. याबाबतची माहिती आता समोर आली आहे.
जळगाव शहरातील मू. जे. महाविद्यालयाच्या परिसरात शिवरामनगरात एकनाथ खडसे यांचा प्रशस्त बंगला आहे. एरवी संपूर्ण खडसे कुटुंबीय मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे वास्तव्यास असल्यामुळे जळगावमधील त्यांच्या बंगल्यात कामाशिवाय फार कोणाचा वावर शक्यतो नसतो. हाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रेकी करून रात्रीच्या वेळी खडसेंच्या बंगल्यातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला.
घरातून सोने, चांदी आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे. घरातील सोन्याचे आणि चांदीचे दागिने गायब झाले आहेत. त्यामधील सोन्याच्या वस्तूंमध्ये २० ग्रॅमची गहू पोत, ७ ग्रॅमचे कानातले, ४ ग्रॅमचे डायमंडचे कानातले, ७ ग्रॅमच्या अंगठ्या, १० ग्रॅमचे गोल, २० ग्रॅमच्या चार अंगठ्या चोरीला गेल्या आहेत. एकूण ६८ ग्रॅम सोने चोरीला गेले आहे. घरातील चांदीच्या वस्तूंमध्ये १ किलोची गदा, १ किलोचे त्रिशूल, चांदीचे सहा ग्लास, २ किलोची चांदीची तलवार, २ किलो वजनाचे दोन चांदीचे रथ होते. एकूण ७ किलो ७०० ग्रॅम चांदी चोरीला गेली आहे. तसेच एकनाथ खडसे यांच्या घरातून ३५ हजार रुपयांची रोकड देखील चोरीला गेली आहे. अंदाजे एकूण 10 ते 12 लाख रूपयांची चोरी झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर