
नंदुरबार, 28 ऑक्टोबर, (हिं.स.) शहादा तालुक्यातील बुडीगव्हाण परिसरात सराफ व्यावसायिक रितेश पारेख यांचे काही हल्लेखोरांनी भरदिवसा अपहरण करून ५० किलो चांदी, सोने आणि रोकडची लूटमार केली. रितेश पारेख हे शहादा शहरातून म्हसावदकडे व्यापारासाठी जात असताना काही संशयितांनी त्यांच्या कारचा पाठलाग करून वाहनाच्या काचा फोडल्या आणि त्यांच्यावर हल्ला केला.
या दरम्यान, हल्लेखोरांनी अंदाजे ५० किलो चांदी, काही प्रमाणात सोने आणि मोठी रोकड लुटल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकारात व्यावसायिकाला धमकावून अपहरण करण्यात आले. विशेष म्हणजे, हा प्रकार म्हसावद पोलिस ठाण्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर घडल्याने पोलिसांच्या गस्ती व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच रितेश पारेख यांचे नातेवाईक आणि शहरातील सराफ व्यावसायिकांनी शहादा पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. अपहरणकर्त्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी नातेवाईक व व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर