
जळगाव, 28 ऑक्टोबर, (हिं.स.) - दरोडा टाकण्याच्या उद्देशाने बसलेल्या टोळीवर चोपडा शहर पोलिसांनी झडप टाकून सात जणांना अटक केली असून त्यांच्याकडून लोडेड गावठी पिस्तुलांसह घातक शस्त्रे आणि वाहन असे एकूण 13 दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोपडा शहरातील शिरपूर बायपास रोडवर मध्यरात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री २:३० वाजण्याच्या सुमारास चोपडा शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी (MH-26 CH-1733) रस्त्यावर बराच वेळ थांबलेली असल्याचे कळले. यानंतर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ शोध मोहीम हाती घेतली. रणगाडा चौकाजवळ संशयास्पद वाहन दिसताच पोलिसांनी वेढा घालून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सातही संशयितांना ताब्यात घेतले. गाडीची झडती घेतली असता दोन संशयितांकडे लोडेड गावठी पिस्तुले, तर गाडीतून दोन तलवारी आणि एक रिकामे मॅगझीन जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये
दिलीपसिंह हरिसिंह पवार (वय ३२, रा. नाथनगर, नांदेड)
विक्रम बाळासाहेब बोरगे (वय २४, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर)
अनिकेत बालाजी सूर्यवंशी (वय २५, रा. नवामोंढा, नांदेड)
अमनदीपसिंह अवतारसिंह राठोड (वय २५, रा. मगनपूरा, नांदेड)
सदामहुसेन मोहम्मद अमीन (वय ३३, रा. इतवारा, नांदेड)
अक्षय रविंद्र महाले (वय ३०, रा. भावसार गल्ली, चोपडा)
जयेश राजेंद्र महाजन (वय ३०, रा. भाट गल्ली, चोपडा) यांचा समावेश असून हे सर्व आरोपी कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, दहशत माजवणे आणि बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
काही आरोपींवर नांदेड, वैजापूर आणि चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असून, काहींवर MPDA कायद्यांतर्गत कारवाई झालेली आहे. हे आरोपी अलीकडेच कारागृहातून सुटलेले आहेत. तपासात असेही उघड झाले की, हे सर्वजण संगनमताने रस्त्यावर दरोडा आणि लूट करण्याच्या उद्देशाने शस्त्रसज्ज अवस्थेत एकत्र जमले होते. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी गु.र.नं. ५८१/२०२५ अंतर्गत भा.द.वि. कलम ३१०(४), ३१०(५), शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५, ४/२५ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली.
या कारवाईत पोलिसांनी गावठी पिस्तूल, तलवारी, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि चारचाकी वाहन असा एकूण १३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर