
काबुल, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। तुर्कीमध्ये सुरू असलेली अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील शांतता चर्चा आता तिसऱ्या दिवसावर येऊन पोहोचली आहे. मात्र अद्याप कोणतेही ठोस समाधान निघालेले नाही. या दरम्यान, अफगाण तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी कडक इशारा देत म्हटले आहे की, “जर कोणत्याही देशाने अफगाणिस्तानवर हल्ला केला, तर त्याला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल.” त्यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी हा थेट इशारा पाकिस्तानकडे असल्याचे स्पष्ट दिसते.
मुजाहिद यांनी सोमवारी (दि.२७) सरकारी चॅनलवर सांगितले,“तुर्कीमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा तिसऱ्या दिवशी सुरू आहे आणि आम्ही याच्या निष्कर्षांची प्रतीक्षा करत आहोत. अफगाणिस्तान संवादाद्वारे समस्या सोडवू इच्छितो, पण जर कोणी हल्ला केला तर प्रत्युत्तर दिले जाईल.”
दोन्ही देशांचे प्रतिनिधी इस्तंबूलमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या फेरीच्या शांतता चर्चेत सहभागी आहेत. ही चर्चा 19 ऑक्टोबरला कतारमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर सुरू झाली होती. त्या वेळी पाकिस्तान-अफगाण सीमा भागात झालेल्या हिंसाचारात डझनभर लोकांचा मृत्यू झाला होता. हा संघर्ष तालिबानने 2021 मध्ये सत्तेवर आल्यानंतरचा सर्वात भयानक संघर्ष मानला जातो.
अहवालानुसार, तुर्कीच्या मध्यस्थीखाली चाललेल्या या चर्चांमध्ये दोन्ही बाजूंमध्ये दीर्घकालीन युद्धविरामावर सहमती साधण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु अद्यापही मोठे मतभेद कायम आहेत. पाकिस्तानच्या सुरक्षा स्रोतांनी अफगाण तालिबानवर सहकार्य न केल्याचा आरोप केला आहे. एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने म्हटले, “सीमापार दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणताही तडजोडीचा प्रश्नच नाही.” त्यावर तालिबानच्या प्रतिनिधीने उत्तर दिले की हे आरोप “चुकीचे आणि दिशाभूल करणारे” आहेत आणि चर्चा “सकारात्मक वातावरणात सुरू” आहे.
दरम्यान, चर्चेदरम्यानच पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि उत्तर वझिरिस्तान सीमारेषेवर घुसखोरीचे दोन मोठे प्रयत्न रोखण्यात आले. पाकिस्तानच्या लष्करानुसार, या चकमकींमध्ये २५ दहशतवादी ठार झाले, ज्यांपैकी चार आत्मघाती हल्लेखोर होते. पाकिस्तानच्या लष्कराच्या मीडिया विंगने सांगितले की, हे दहशतवादी अफगाण सीमेतून घुसखोरीचा प्रयत्न करत होते, आणि त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र व स्फोटके जप्त करण्यात आली. या लढाईत पाकिस्तानचे पाच सैनिक देखील मारले गेले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode