
जळगाव , 27 ऑक्टोबर (हिं.स.) : पिंपळगाव हरेश्वर येथे एका मनोरुग्ण युवतीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे तर दुसरा आरोपी बालसुधारगृहात पाठविण्यात आला आहे. मंगेश उर्फ राहुल आनंदा पवार (वय २५) व एक १५ वर्षीय अल्पवयीन बालक (बालविधी संघर्ष बालक), यांनी मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या पीडित युवतीसोबत अज्ञात स्थळी नेऊन बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेबाबत पीडितेच्या भावाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा रजिस्टर क्र. २९६/२०२५ भा.दं.वि. कलम ७०(१), ६४(२), ६४(२)(k), ८७, ९२(a), ९२(b) अंतर्गत दोघांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
यानंतर पोलीसांनी मुख्य आरोपी मंगेश उर्फ राहुल पवार याला तात्काळ अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसरा अल्पवयीन आरोपी बालविधी संघर्ष बालक असल्याने त्याला बालसुधारगृहात २८ ऑक्टोबरपर्यंत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, पोलीस नाईक पांडुरंग गोरबंजारा आदींनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर