
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर (हिं.स.) दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती शटलर पीव्ही सिंधूने यावर्षी उर्वरित सर्व बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्ल्यूएफ) स्पर्धांमधून माघार घेतली आहे. पायाच्या दुखापतीमुळे तिने हा निर्णय घेतला आहे.
सिंधूने एक्स वर लिहिले की, दुखापत प्रत्येक खेळाडूच्या प्रवासाचा एक भाग असतो. माझ्या टीम आणि क्रीडा औषध तज्ज्ञ डॉ. पारडीवाला यांच्याशी चर्चा केल्यानंतर, मी निर्णय घेतला आहे की, या वर्षी उर्वरित सर्व बीडब्ल्यूएफ स्पर्धांमधून माघार घेणे चांगले राहील.
पीव्ही सिंधू म्हणाली, युरोपियन स्पर्धेपूर्वी मला झालेली दुखापत पूर्णपणे बरी झालेली नाही. हे स्वीकारणे सोपे नाही, पण दुखापती प्रत्येक खेळाडूच्या प्रवासाचा एक भाग आहेत. त्या तुमच्या धैर्याची आणि संयमाची परीक्षा घेतात आणि तुम्हाला पुन्हा मजबूत होण्यासाठी प्रेरणा देतात.
पुनर्प्राप्ती आणि प्रशिक्षण प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. मी डॉ. वेन लोम्बार्ड यांच्या देखरेखीखाली कठोर परिश्रम करत आहे. माझ्यासोबत एक संघ आहे जो मला दररोज शक्ती देतो. माझ्यावरचा त्यांचा विश्वास हाच माझा सर्वात मोठा विजय आहे.
युरोपियन दौऱ्याच्या सुरुवातीपूर्वी सिंधूला पायाची दुखापत झाली होती. दुखापतीत लक्षणीय सुधारणा झाली असली तरी, दीर्घकालीन तंदुरुस्ती आणि कामगिरी राखण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. म्हणूनच, तिच्या वैद्यकीय आणि कामगिरी पथकाने सुचवले की आत्ताच स्पर्धेत परतण्यापेक्षा पूर्ण पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रित करणे चांगले राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे