
मुंबई, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। काही वर्षांपूर्वी भारतात ५जी इंटरनेट सुरू झाल्यानंतर दूरसंचार क्षेत्रात जशी क्रांती झाली, तशीच लाट आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय ) जगतात उसळण्याची शक्यता आहे. ओपनएआयने नुकतीच मोठी घोषणा करत चॅटजीपीटी गो या लोकप्रिय प्लॅनची सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ४ नोव्हेंबर २०२५ पासून ते ४ नोव्हेंबर २०२६ या संपूर्ण वर्षभरासाठी युजर्सना हा प्लॅन कोणतेही शुल्क न देता वापरता येणार आहे.
आत्तापर्यंत चॅटजीपीटी गो वापरण्यासाठी दरमहा ३९९ रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र आता हा प्लॅन मोफत करण्यात आल्याने, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सेवा अधिकाधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचणार आहेत. चॅटजीपीटी गो हा ओपनएआय कडून दिल्या जाणाऱ्या चार प्रमुख वैयक्तिक प्लॅन्सपैकी एक आहे. या प्लॅनमुळे युजर्सना फाइल अपलोड, इमेज जनरेशन, प्रोजेक्ट तयार करणे आणि स्वतःचे GPTs बनविण्याची सुविधा मिळेल. म्हणजेच फ्री व्हर्जनच्या तुलनेत अधिक फीचर्स आणि गती या प्लॅनमध्ये उपलब्ध राहतील.
सध्या ओपनएआय कडून फ्री, गो, प्लस आणि प्रो असे चार वैयक्तिक प्लॅन उपलब्ध आहेत. त्यात फ्री प्लॅनमध्ये मूलभूत सेवा मर्यादित प्रमाणात दिल्या जातात. गो प्लॅनमध्ये त्याच सेवा विस्तारित स्वरूपात मिळतात, तर प्लस प्लॅनसाठी १९९९ रुपये प्रतिमहिना आकारले जातात आणि त्यामध्ये आधुनिक GPT-5 मॉडेल, व्हिडिओ जनरेशन व कोडेक्स एजंटसारख्या सुविधा दिल्या जातात. प्रो प्लॅन हा सर्वाधिक प्रीमियम असून त्यासाठी तब्बल १९,९०० रुपये प्रतिमहिना शुल्क आहे. त्यात सर्व फीचर्सचा अमर्याद वापर, रिसर्च प्रिव्ह्यू आणि व्यावसायिक वापरासाठीचे टूल्स देण्यात आले आहेत.
वैयक्तिक प्लॅन्सव्यतिरिक्त ओपनएआयने व्यावसायिक वापरकर्त्यांसाठीही दोन प्लॅन सुरू केले आहेत. त्यात ChatGPT Business (Free) हा मोफत असून, GPT-5 चा वापर आणि मर्यादित इमेज व फाइल अपलोड सुविधा मिळतात. तर ChatGPT Business Premium साठी २०९९ रुपये प्रतिमहिना शुल्क आकारले जाते. या प्लॅनमध्ये टीम कोलॅबोरेशन, सुरक्षा, डेटा गोपनीयता, शेअरपॉइंट एकत्रीकरण, कस्टम GPTs, व्हॉइस ट्रान्स्क्रिप्शन आणि व्हिडिओ जनरेशन यांसारख्या सर्व सुविधा समाविष्ट आहेत.
ओपनएआयचा हा निर्णय कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेचे प्रतिबिंब मानला जात आहे. चॅटजीपीटी गो मोफत केल्यामुळे जगभरातील लाखो वापरकर्ते अधिक प्रमाणात एआय साधनांचा वापर करतील, ज्यामुळे ज्ञान, शिक्षण, कामकाज आणि व्यवसाय या सर्व क्षेत्रांमध्ये नव्या शक्यता निर्माण होतील. इंटरनेटप्रमाणेच, आता एआय तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची हीच सुरुवात मानली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule