
नवी दिल्ली, २८ ऑक्टोबर, (हिं.स.) अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना २०२६ फिफा विश्वचषकात खेळण्याची आशा निर्माण केली आहे. त्याने असेही स्पष्ट केले की, त्याचे वय आणि तंदुरुस्ती तो २०२6 च्या विजेतेपदासाठी अर्जेंटिनाकडून खेळेल की नाही हे ठरवणार आहे.
मेस्सी पुढील वर्षी जूनमध्ये ३९ वर्षांचा होणार आहे. त्याने इंटर मियामीशी त्याचा करार २०२८ पर्यंत वाढवला आहे. यावरून असे दिसून येते की, तो अद्याप निवृत्तीचा विचार करत नाही. माध्यमांशी बोलताना, आठ वेळा बॅलन डी'ओर विजेता म्हणाला, विश्वचषकात खेळणे ही एक असाधारण गोष्ट आहे आणि मला त्याचा भाग व्हायला आवडेल. मला तिथे राहायचे आहे, तंदुरुस्त राहायचे आहे आणि संघासाठी उपयुक्त व्हायचे आहे. पण पुढच्या वर्षी प्री-सीझन सुरू झाल्यावर मी माझ्या परिस्थितीचे मूल्यांकन करेन आणि नंतर अंतिम निर्णय घेईन.
मेस्सी पुढे म्हणाला, आम्ही गेल्या विश्वचषकात विजय मिळवला होता आणि आता मैदानावर आमचे टायटल डिफेंड करण्याची संधी मिळणे आश्चर्यकारक ठरेल. प्रत्येक फुटबॉलपटू आपल्या देशासाठी विश्वचषक खेळण्याचे स्वप्न पाहतो आणि ते नेहमीच माझ्यासाठी स्वप्न राहिले आहे.
२० वर्षांहून अधिक काळाच्या त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीत, मेस्सी बार्सिलोना, पॅरिस सेंट-जर्मेन आणि आता इंटर मियामीकडून खेळला आहे. २०२३ मध्ये एमएलएसमध्ये सामील होऊन, त्याने अमेरिकन फुटबॉल लीगमध्ये नवीन जीवन दिले आहे - विशेषतः उत्तर अमेरिका पुढील वर्षी विश्वचषक आयोजित करणार आहे.
मेस्सीने २०२१ कोपा अमेरिका आणि नंतर २०२२ कतार विश्वचषक जिंंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अंतिम फेरीत फ्रान्सला पेनल्टी शूटआउटमध्ये (४-२) पराभूत करत त्याने अर्जेन्टीनाला फिफा विश्वचषकाचे अजिंक्य पटकावून दिले होते.
मेस्सी म्हणाला, ते माझे आयुष्यातील स्वप्न होते. व्यावसायिकदृष्ट्या ते एकमेव काम उरले होते, कारण मी क्लबमध्ये आणि वैयक्तिकरित्या जवळजवळ सर्वकाही साध्य केले होते.आतापर्यंत १९५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ११४ गोल करणारा मेस्सी जर २०२६ मध्ये खेळला तर तो त्याचा सहावा फिफा विश्वचषक असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे