
अकोला, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त जिल्हास्तरीय पदयात्रेचे आयोजन होणार असून, सर्व यंत्रणांनी समन्वयाने हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.
उपक्रमाच्या पूर्वतयारीबाबत बैठक जिल्हाधिका-यांच्या दालनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. माय भारत केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक महेश शेखावत व इतर यंत्रणांचे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, राष्ट्रीय एकता दिवस भारताच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकजुटीचे प्रतीक असून, आधुनिक भारताची पायाभरणी करणाऱ्या सरदार पटेलांच्या अद्वितीय कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे. यानिमित्त दि. 31 ऑक्टोबर ते दि. 25 नोव्हेंबर दरम्यान पदयात्रा, रक्तदान शिबिर, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, निबंध स्पर्धा, पथनाट्य, वादविवाद स्पर्धा, स्वच्छता मोहिम, आरोग्य शिबिरे आदी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाईल.
दि. 11 नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत वसंत देसाई क्रीडांगणापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रेचे आयोजन केले जाईल. त्याचप्रमाणे, ठिकठिकाणी ३ दिवस पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रेदरम्यान आत्मनिर्भर भारताची प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम व प्रमाणपत्र वितरण होईल. हे सर्व उपक्रम सर्व विभागांनी समन्वयाने कामे करून यशस्वी करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे