अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल; शेकापकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रायगड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यात 26 ते 28 सप्टेंबर आणि 21 ते 28 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भातशेतीसह नारळ, सुपारी, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात
अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल; शेकापकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


रायगड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यात 26 ते 28 सप्टेंबर आणि 21 ते 28 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भातशेतीसह नारळ, सुपारी, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे करण्यात आली.

शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, ॲड. गौतम पाटील, प्रदीप नाईक, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अनिल पाटील, ॲड. परेश देशमुख, तालुका चिटणीस सुरेश घरत, ॲड. निलम हजारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या अवकाळी पावसामुळे भात पिके पाण्याखाली गेली असून कणसे मोडली, काही ठिकाणी पिकांना कोंब फुटले आहेत. सुपारी व आंबा बागांचेही नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेल्याने ते हवालदिल झाले आहेत. शासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच भात विक्री केंद्र सुरू करणे आणि भाताचा खरेदी दर वाढविणे, या मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या या मागण्या लक्षात घेऊन शक्य ती कार्यवाही व पंचनामे करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्याचे शेकाप शेतकरी सभा तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande