
अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.)
अमरावती शहर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा उत्कृष्ट तपास कौशल्य दाखवत वाहन चोरी करणारी सराईत टोळी गजाआड केली आहे. या कारवाईत पोलिसांनी शेती उपयोगी ट्रॅक्टर, टॉली, मोटारसायकली व इतर चोरीस गेलेली वाहने असा तब्बल ₹३३,५०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.भातकुली येथील सदानंद पांडूरंग बोचे यांचा सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर कोणीतरी अज्ञात इसमाने घरासमोरून चोरी करून नेला होता. या प्रकरणी पोलीस स्टेशन भातकुली येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील आणि मार्गावरील ८० ते ९० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यातून आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला. तपासात उघड झाले की आरोपींनी चोरीचा ट्रॅक्टर १७ ते १८ गावांतून नेऊन बोरगाव मंजू परिसरात लपवला होता.
यानंतर गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी टोळीचा शोध घेऊन खालील आरोपींना ताब्यात घेतले – भूषण श्रीकृष्ण ठाकरे (वय २४, रा. अनकवाडी, जि. अकोला) गजानन प्रल्हाद ताठे (वय २५, रा. मारोडी, जि. अकोला) मधु मिलींद शिरसाठ (वय ३०, रा. आपोती खुर्द, जि. अकोला) कार्तिक संजय पोहकार (वय २३, रा. मारोडी, जि. अकोला) वैभव उर्फ छकुला बाबुजी आठवले (वय २७, रा. कपीलेश्वर, पो. स्टे. पिंजर, जि. अकोला – फरार) विधीसंघर्षग्रस्त बालक (अल्पवयीन)
या आरोपींवर यापूर्वीच खून, रेती चोरी, ट्रॅक्टर चोरी, डिझेल चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप विविध पोलीस ठाण्यांत दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.सदर आरोपींना अटक करून त्यांच्याकडून अधिक चौकशी केली असता त्यांनी अन्य काही वाहन चोरीच्या घटनांची कबुली दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी