अमरावतीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पोस्टरबाजी तेजीत
अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.)महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. अमरावती मतदारसंघांतील सर्वच प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची चळवळ जोमात सुरू झाली आहे. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात कोणतेही ठोस सामाजिक कार्य न करणारे अ
जनतेच्या दारी, पुन्हा हजेरी भारी!...  शहरातील प्रभागात स्वयंघोषित पदव्यांनी सजलेले फलक आणि बॅनर


अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.)महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. अमरावती मतदारसंघांतील सर्वच प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची चळवळ जोमात सुरू झाली आहे. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात कोणतेही ठोस सामाजिक कार्य न करणारे अनेकजण आता 'जनसेवक', 'आपला माणूस', 'लोकसेवक', 'युवा नेते', 'सामाजिक कार्यकर्ते' अशा स्वयंघोषित पदव्यांनी सजलेले फलक आणि बॅनर लावून नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहरातील गल्लीबोळ, चौक, बाजारपेठा आणि सोसायट्यांच्या भिंतींवर शुभेच्छा बॅनर, वाढदिवसाचे पोस्टर आणि 'जनतेचा सेवक' अशी घोषणा असलेले फ्लेक्स झळकताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही या स्वयंघोषित नेत्यांचा प्रचार जोरात सुरू असून, फोटोशूट, व्हिडीओ पोस्ट आणि रील्सच्या माध्यमातून 'जनतेत आपलेपणा' निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.या शिवाय गेल्या 5 वर्षात नागरिकांच्या समस्यांसाठी महापालिकेकडे साधे एक निवेदन न देणारे काही जण आता अचानकच सक्रिय सामाजिक कार्यकर्ते बनले आहेत. अनेकांनी रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, कचरा, ड्रेनेज, आरोग्य, वाहतूक कोंडी, विविध विकासकामांच्या मुद्द्यांवर निवेदने देण्यास सुरुवात केली आहे. 'पाच वर्षे नजरेआड अन् आता लोकसेवक' नागरिकांमध्ये या अचानक वाढलेल्या सामाजिक सक्रियतेबद्दल मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर नागरिक उघडपणे याबाबत व्यक्त होताना दिसत आहेत. पाच वर्षे नजरेआड असलेले हेच आता लोकसेवक कसे बनले? असा प्रश्न मतदार विचारत आहेत. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande