डिजिटल युगातील धोक्यांपासून सावध! गडचिरोली पोलिसांकडून 'सायबर जनजागृती कार्यशाळा
गडचिरोली, 29 ऑक्टोबर (हिं.स.) दिवसेंदिवस वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या आणि ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी, केंद्रीय गृह मंत्रालय आणि I4C (Indian Cyber Crime Coordination Centre) यांच्या निर्देशानुसार, गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ''सायबर
सायबर कार्यशाळेला मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक


गडचिरोली, 29 ऑक्टोबर (हिं.स.)

दिवसेंदिवस वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या आणि ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी, केंद्रीय गृह मंत्रालय आणि I4C (Indian Cyber Crime Coordination Centre) यांच्या निर्देशानुसार, गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने 'सायबर जनजागृती माह' (ऑक्टोबर २०२५) अंतर्गत कारमेल हायस्कुल येथे भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेत ८ वी ते १० वीच्या २५० विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे महत्त्वपूर्ण धडे देण्यात आले.

कार्यशाळेदरम्यान, विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, ऑनलाईन फसवणुकीच्या पद्धती (Online Fraud) आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ओटीपी (OTP) कोणालाही शेअर न करणे आणि अनोळखी लिंकवर (Link) क्लिक न करणे यांसारख्या आवश्यक बाबी व्हिडिओंच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आल्या.

'१९३० व १९४५ हे गोल्डन नंबर' - पोलीस अधीक्षक नीलोत्पल

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी, आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाईन व्यवहार आपल्या जीवनाचा भाग बनले असले तरी यातून होणारी आर्थिक फसवणूक, माहिती चोरी आणि हॅकिंग या घटनांविषयी आपण सतर्क राहिले पाहिजे. यापासून सुरक्षित राहण्यासाठी १९३० व १९४५ हे गोल्डन नंबर आहेत, असे स्पष्ट केले.

सायबर गुन्हा घडल्यास त्वरित १९३० या क्रमांकावर किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून दिवसातून एका तासापेक्षा अधिक वेळ मोबाईल वापरणे टाळावे, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला.

जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन

या जनजागृती मोहिमेचा भाग म्हणून, गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज सायबर जनजागृती सायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. याशिवाय, संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात पोलीस मुख्यालय आणि सर्व पोलीस स्टेशन स्तरावर विविध जनजागृती कार्यक्रम, वेबिनार्स आणि सोशल मीडियावरील प्रचार मोहीम राबविण्यात येत आहे.

या कार्यशाळेला अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरज जगताप, पोस्टे गडचिरोलीचे पोनि श्री. विनोद चव्हाण, स्थागुशाचे पोनि श्री. अरूण फेगडे यांच्यासह कारमेल हायस्कुलचे मुख्याध्यापक फादर मेलजो चेरीयन व उप मुख्याध्यापक फादर जॉर्ज वर्गीस उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande