
जळगाव, 29 ऑक्टोबर, (हिं.स.) - जिल्ह्यातील वडोदा वनक्षेत्र तसेच प्रस्तावित ‘मुक्ताई–भवानी अभयारण्य’ या व्याघ्र अधिवास क्षेत्रात शिकारीसाठी अवैधरीत्या प्रवेश केलेल्या दोन जणांना वनविभागाच्या चमूने रात्रीच्या कारवाईत बंदुकींसह ताब्यात घेऊन धाडसी व कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. रात्री सुमारे १२.२० वाजता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वडोदा वनपरिक्षेत्र अधिकारी डोलारखेडा वनपरीमंडळासह गस्त घालत असताना कक्ष क्रमांक ५४२ सुकळी नियत क्षेत्रात दोन संशयित इसम बंदुकींसह चितळ शिकार करण्याच्या तयारीत दिसून आले. वनकर्मचाऱ्यांची चाहूल लागताच त्यांनी पलायनाचा प्रयत्न केला, मात्र कर्मचाऱ्यांनी शौर्य दाखवत पाठलाग करून दोघांना घटनास्थळीच जेरबंद केले.
चौकशीत आरोपींची नावे अजीज अन्सारी (वय २९) व जलील अहमद (वय ५०) अशी समोर आली असून, त्यांच्या ताब्यातून दोन गावठी बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींविरुद्ध वनअधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून शिकार जाळे, बारूद व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.ही धाडसी कारवाई उपवनसंरक्षक राम धोत्रे व सहाय्यक वनसंरक्षक सुदर्शन शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल गणेश गवळी, वनरक्षक गोकुळ गोसावी, नवल जाधव, नितीन खंडारे, रजनीकांत चव्हाण, अक्षय मोरे व सुधाकर कोळी यांनी संयुक्तरीत्या पार पाडली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर