
दोन लाखांची आर्थिक मदत व पाच क्विंटल तांदूळ देऊन प्राणीसेवेसाठी पुढाकार
अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.)
श्री गोरक्षण पशुवैद्यकीय रुग्णालय आणि वसा प्राणी वाचवा पशु सेवा केंद्राला माजी पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी केंद्रातील निवारस व उपचार घेत असलेल्या प्राण्यांची पाहणी करत कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कार्याची माहिती घेतली. प्रविण पोटे पाटील यांनी केंद्रात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा, उपचार साधने आणि देखभालीच्या उपक्रमांचा आढावा घेत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. प्राणीसेवेतील या संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव करत त्यांनी पाच क्विंटल तांदूळ आणि दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.“वसा पशु सेवा संस्था खऱ्या अर्थाने प्राणिमात्रांची सेवा करत आहे. समाजासाठी प्रेरणादायी असे हे कार्य आहे,” असे गौरवोद्गार श्री. प्रविण पोटे पाटील यांनी यावेळी काढले. तसेच, समाजातील नागरिकांनीही या संस्थेच्या सेवाभावी कार्यात आपला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी श्रेयशदादा पोटे पाटील, श्रुतीताई पोटे पाटील, चेतन पवार, प्रकाश पुंड, बबन लायदे, जगदीश कांबे, अभिजित वानखडे, मनीष चौबे, अंकित कावळे आदी मान्यवर उपस्थित होते.वसा पशु सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रविण पोटे पाटील यांच्या मदतीबद्दल आणि भेटीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी