
रत्नागिरी, 30 ऑक्टोबर, (हिं. स.) : जिल्ह्यात झालेल्या तीन दिवसातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे विशेषत: भातशेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल हे आज सोमेश्वर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांनी भात कापून मळणीसाठी ठेवले होते. गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसामध्ये ते भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी सोमेश्वर येथील शेतकऱ्यांच्या भातपिकाच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधून, या नुकसानीची माहिती घेतली.
जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी पंचनामे करावेत. त्यासाठी गावातच शिबिर घेऊन कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. आवश्यक तेवढ्याच कागदपत्रांची मागणी करावी. विनाकारण कागदपत्रांची संख्या वाढवू नये.
हेक्टरी साडेआठ हजार देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईमध्ये वाढ करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. ही मागणी शासनाला कळवली जाईल. त्यामध्ये वाढ करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अन्य पिकांच्याबाबतही माहिती घेतली. तसेच कृषी पर्यटन क्षेत्राबाबतही चर्चा केली.
गावामध्ये पंचनामे सुरू असून, आजअखेर साडेपाच हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली. या पाहणीवेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, सरपंच दीपश्री पाटील, शेतकरी राजेंद्र चव्हाण, सुभाष भातडे, एकनाथ हरचेरीकर आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी