
मृत बाळामुळे महिलेचा जीव आला होता धोक्यात
परभणी, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।
परभणी शहरातील एका ३८ वर्षीय गर्भवती महिलेची गंभीर वैद्यकीय परिस्थितीत आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या आर.पी हॉस्पिटलच्या तत्पर वैद्यकीय सेवेमुळे तिला जीवनदान मिळाले आहे. या महिलेच्या गर्भातील बाळ मृत झाल्याने तिला अतिरिक्त रक्तस्राव आणि वाढलेला रक्तदाब यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले.यावर मात करत आर.पी हॉस्पिटलने महिलेचा जिव वाचवला.
गरोदरपणाचे नऊ महिने पूर्ण झाल्याने तिची परिस्थिती आणखीनच नाजूक बनली होती. परभणी शहरातील विविध दवाखान्यांमध्ये उपचारासाठी गेल्यावरही तिला कोणत्याही हॉस्पिटलने दाखल करून घेतले नाही. स्थानिक डॉक्टरांनी तिला नांदेड येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. अखेर, ही महिला परभणीतील आर.पी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली, जिथे तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
आर.पी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर सर्वप्रथम या महिलेच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. तपासण्यांमधून तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. वेळ न दवडता, हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीमने तत्काळ शस्त्रक्रियेचा (सिझेरियन सेक्शन) निर्णय घेतला. अनुभवी डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया अवघ्या ३० मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान मृत गर्भ काढून टाकण्यात आला. मात्र, या प्रक्रियेत महिलेला अतिरिक्त रक्तस्रावाचा सामना करावा लागला. ज्यामुळे तिची गर्भपिशवी निळी पडली होती, असे डॉ. भीमराव कानकुटे यांनी सांगितले. शस्त्रक्रियेदरम्यान गर्भपिशवीतून सुमारे १ किलो वजनाच्या रक्ताच्या गाठी काढण्यात आल्या, तर महिलेच्या शरीरातून एक ते दीड लिटर रक्तस्राव झाल्याचेही डॉ. कनकुटे यांनी नमूद केले.
या जटिल शस्त्रक्रियेत आर.पी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमीर तडवी व तज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. डॉ. भीमराव कनकुटे व डॉ.फराह तडवी यांनी शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले. तर भूलतज्ञ डॉ.श्रुती शहारे यांनी रुग्णाला स्थिर ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावली. याशिवाय, डॉ. श्वेता, डॉ. प्रतिष्ठा, तसेच समुपदेशक स्वप्नील बोर्डे,ऑपरेशन थिएटर टेक्निशियन संध्या आळणे, किशोर नवले आणि पवन लोंढे यांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला. या सर्वांच्या समन्वयित प्रयत्नांमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली.
शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने तिला तत्काळ आयसीयू (इंटेन्सिव्ह केअर युनिट) मध्ये दाखल करण्यात आले. या दरम्यान सदरील महिलेला हॉस्पिटल मधील शांताई ब्लड बँक मधून 5 रक्ताच्या बॅग देण्यात आल्या . तसेच डॉक्टरांच्या चोवीस तास देखरेखीखाली उपचार सुरू ठेवण्यात आले. वाढलेला रक्तदाब आणि रक्तस्रावामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यामुळे महिलेची प्रकृती हळूहळू स्थिर झाली.
हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे म्हणाले, आमच्या हॉस्पिटलची तात्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता आणि आमच्या तज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे अशा गंभीर परिस्थितीत रुग्णांचा जीव वाचवणे शक्य होते. आम्ही नेहमीच रुग्णसेवेसाठी कटिबद्ध आहोत. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे आणि आम्ही भविष्यातही अशीच उच्च दर्जाची सेवा देत राहू.या सर्व डॉक्टरांच्या पथकाचे आ.पाटील यांनी कौतुक केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis