
परभणी, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी विहिरी, गायगोठे आदींची कामे पूर्ण करूनही मागील चार वर्षांपासून त्यांच्या कुशल बिलांचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. 2021 पासून प्रलंबित असलेली ही बिले तात्काळ मंजूर करण्याच्या मागणीसाठी देऊळगाव दुधाटे (ता. पुर्णा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण व पुर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मिसाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून 2021 पासून प्रलंबित विहिरींची कुशल बिले महिनाभरात काढून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, प्रशासनाने आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे, जिल्हाध्यक्ष रामप्रसाद गमे, परभणी तालुकाध्यक्ष मुंजा लोडे, पुर्णा तालुकाध्यक्ष पंडितअण्णा भोसले, माऊली शिंदे, पालम तालुकाध्यक्ष नागेश दुधाटे, आदिनाथ लवंदे, अॅड. राम गोळेगावकर, भगवान दुधाटे, विष्णु दुधाटे, बळीराम दुधाटे, अब्बाराव दुधाटे, मोतीराम दुधाटे, एकनाथ जोगदंड, व्यंकटराव दुधाटे, प्रल्हाद दुधाटे, माधवराव दुधाटे, अनिल दुधाटे, नवनाथ दुधाटे, शंकर दुधाटे, बळी दुधाटे, उपसरपंच दिगंबर दुधाटे, पोलिस पाटील शिवाजी दुधाटे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनास परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis